Saturday, 21 March 2015

एक प्रवास

"इथे कोण बसलंय का " या विचारण्याने पुस्तक वाचनात मग्न असलेल्या मिनल ने वर पाहिले
"नाही इथे कोणीच बसलेले नाही " मिनल ने उत्तर दिले
खादी सलवार कमीज ,शबनम ची बैग,छान कापलेले केस, त्यावर असलेला goggle,तांबूस गोरा वर्ण
मिनल तिला तिच्या नकळत न्याहाळत होती.

"धन्यवाद " असा म्हणून ती बसली . तिच्या चेहऱ्यावर जागा मिळाल्याचे समाधान होते.
थोडे स्थिरस्थावर झाल्यावर अंजलीने आपल्या बैगेतून पाण्याची बाटली काढून थोडे पाणी प्यायले.
कोणीतरी आपल्याकडे पाहतंय का या जाणीवेने अंजलीने बाजुला बसलेल्या मिनल कडे पहिले
मिनल ला थोडे ओशाळल्या सारखे झाले तिने पटकन आपले डोके पुस्तकात खुपसले

फलाटावरून ट्रेन निघाली,खिडकीतुन वारा आत येऊ लागला, आणि सगळे ट्रेन बरोबर धाऊ लागले
ट्रेन धावत होती तसे रस्ते, झाडं बिल्डिंग, सायकल मागे पडत होते आणि त्यांच्या बरोबर अंजली चे मनही मागे धाऊ लागले क्षणात तिला तिचे घर आठवले. तिच्यावर निर्मळ प्रेम करणारी आजी आठवली.  ती देवाघरी गेल्यावर तिच्या आठवणीने कसे व्याकूळ झालो आपण  ते आठवले. खुप माणस असलेल्या या शहरात आपण राहतोय पण तरीही कुठेतरी एकटे आहोत याची खंत आहे …. आई वडील असून नसल्यासारखे. तिला तिच्या आजीनेच वाढवले, संस्कार दिले. जगण्यास लायक अश्या गोष्टी शिकवल्या
आई बाबांची भांडणं ऐकत बघत आपला लहान पण सरल … भांडणाचा जोर वाढल्यावर भीतीने कोपऱ्यात बसून राहायचा आणि तिथेच झोपून जायच असा किती वेळा व्हायच. मग आजी येउन मला जवळ घेऊन प्रेमाने मला थोपटायची … माझे कसे होणार या काळजीने ती व्याकूळ व्हायची . आजी हा एकमेव आधार  होता त्या घरातला माझा. आजी होती म्हणून आपण त्या घरात आहोत . आई वडिलांच्या हातून एक चूक घडली आणि आपण जन्माला आलो या तीव्र विचाराने  अंजलीला कसेसेच झाले. माझा जन्म माझ्या वडिलांनी माझ्या आईवर लादला असे आईचे आरोप अंजलीने खूप वेळा ऐकले होते … हे सर्व विचार आजच का बरे यावे …आज तिचा वाढदिवस होता पण कुणालाच त्याचे काही नवते  खूप दिवसांचे साचलेले नकळत डोळ्यातून बाहेर पडू लागले. पण आपण आत्ता कुठे आहोत याचे भान आल्यावर तिने झटकन डोळे टिपले .

मगाच पासून मिनल चे निरीक्षण चालूच होते … अंजलीची होणारी चलबिचल तिला कुठेतरी कळत होती … पण कसे विचारणार या विचाराने ती गप्प बसून राहिली आणि परत पुस्तक वाचू लागली . पुस्तकात मन लागत नव्हते … आज मिनल ला खूप शांत वाटत होते …. किती दिवसांनी हि शांतता ती अनुभवत होती . नाहीतर रोजची धावपळ , सगळ्यांचे सगळे करणे , सगळ्याचे मूड सांभाळणे , सगळ्यांची मन राखणे यातच तिचे दिवस सरत होते … या सगळ्यात ती तिच्याच मनाला विसरून गेली होती . खूप माणस असलेले तिचे घर , सगळा सांभाळता सांभाळता थकून जायची बिचारी … तीन बहिणींच्या मागे हि झाली । हिच्या ऐवजी मुलगा झाला असता तर अशी  दुर्लक्षित म्हणून मोठी झालेली अंजली . मोठ्या बहिणींची पुस्तके कपडे वापरून मोठी होत गेली ती … योग्य वयात येताच लग्न लावून दिले तिचे …  बिचारे आई वडील आधीच गरिबीने गांजलेले । नवरा , मुल बाळ यात सतत  गुरफटलेली असायची  पण आज खूप शांत वाटत होता तिला

"चाय" "चाय "। गरमा गरम  चाय  !! चहावाल्याच्या ह्या ओरडण्याने त्या दोघी भानावर आल्या … नकळत एकमेकींकडे पहिला … नजरा नजर होऊन हसल्या । हसणे हे किती गुणकारी औषध आहे । दोन अनोळखी व्यक्तींना नकळत जोडण्याचे साधन  । दोघींनीही चहा घेतला ।
" कोणत पुस्तक वाचताय " अंजलीने विचारले । " काही नाही आपले सहजच , मिनल ने उत्तर दिले
"तुमचे नाव काय आहे " मिनल ने विचारले
"माझे नाव अंजली ", आणि तुमचे " ? अंजलीने विचारले
"मी मिनल "
कुठे राहता , काय करता  असे जुजबी प्रश्न झाले … अंजली एका मोठ्या Multinational Company मधे कामाला आहे , स्वताच्या पायावर खंबीर उभी आहे हे ऐकून मिनल ला तिचा हेवा वाटू लागला. समस्त स्त्री वर्गाचा एक universal  problem असतो . स्वतापेक्षा कोणी वरचढ सापडलं कि नकळत मनात तुलना सुरु होते


मिनल ने सुद्धा स्वताबद्दल अंजलीला  सांगितले . ती गृहिणी आहे हे सांगताना तिला थोडे कसेसे झाले आता अंजलीला मी काकुबाई वाटेन  गावांढळ वाटेन असे वाटले. स्वताबद्दल असलेला वेडा  complex  तिला सतत जाणवत असे आजकाल.

काही वेळ शांतात पसरली दोघीत …. परत दोघींमध्ये नजरानजर झाली … अंजलीने मिनल कडे असलेले पुस्तक मागितले … मनशांती असे नाव वाचून तिला हसायलाच आले
"काय झाले हसायला" मिनल ने विचारले …।
 "पुस्तक वाचून कधी मनशांती मिळते का हो " मनशांती मिळायला आजूबाजूची परिस्थिती पण तशीच असायला लागते " निराशाजनक सुस्कारा सोडत अंजली म्हणाली ।
मगाशी अंजलीच्या  होणार्या चलबिचलीचा या वाक्याशी काही संबंध आहे का असा उगाच प्रश्न मिनल ला पडला
"खरय तुमचा पण आपण ती शोधायचा प्रयत्न केला पाहिजे ना " मिनल ने उत्तर दिले …
"प्रयत्न करूनही ती मिळत नसेल तर काय करायचे " अंजलीचा प्रतिप्रश्न
या प्रश्नावर मिनल कडे उत्तर नव्हते कारण तिला पण मनशांती हवी होती । ती नुसतीच हसली

ट्रेन भरधाव धावत होती तशा दोघींच्या गप्पा चालू झाल्या … काही मिनिटांपूर्वी अनोळखी असलेल्या आता आधीपासून ओळखत असल्यासारख्या वाटत होत्या
भरलेल्या घरात मिनल चा जीव उबगला होता तर मोठ्या घरातल्या निर्जीव भिंतींशी बोलून अंजलीला एकटेपणा आला होता
सगळ्यांना सांभाळण्यात मिनल स्वत्व गमावत होती तर स्वत्व सांभाळून अंजली कंटाळली होती
सुबत्ता असून चार प्रेमाच्या शब्दाला आसुसलेली अंजली तर मिनल स्व प्रेमाला आसुसलेली
अंजली च्या घरी कुठे जातेस काय करते असे विचारणारे कोण नव्हते . पूर्ण स्वातंत्र होते तिला
तर मिनलला घरातून निघताना हजार प्रश्नांना समोर जावे लागे
दोघीनाही त्यांच्या त्यांच्या निरस आयुष्याचा कंटाळा आला होता
दोघींना एकमेकींच्या आयुष्याबद्दल हेवा वाटत होता
दोघीनाही बदल हवा होता
मनातले बोलून आज दोघीही मोकळ्या झाल्या होत्या
ओळखीच्या माणसांना मनातला सांगण्यापेक्षा कधी कधी असे अनोळखी जवळ वाटतात
मनाचे बांध आपोआप फुटू लागतात …. खूप काही साठलेले वाहून जाते
मग एक स्वच्छ वाट सापडते समाधानाची

"तुमचा प्रवास कुठवर " समोर बसलेल्या आजींनी विचारले
"खरा प्रवास तर आत्ताच सुरु झालाय आजी बघुया कुठवर जातोय "
अंजलीच्या या उत्तरावर मिनल ने तिला हसून दाद दिली  


No comments:

Post a Comment