Monday, 28 September 2015

सरोज

फोन वाजला बघितले तर सरोज चा फोन।
"हेल्लो!  हा सरोज बोल ग , काय म्हणतेस, किती दिवसांनी ?" मी विचारले .
"मी ठीक आहे तु कशी आहेस ?"
"मी पण मजेत आहे ग. चालुये रुटीन " बोल सहजच फोन केलास ना ? " मी विचारले
"हो ग सहजच, खुप दिवसात भेटलोच नाहीये आपण , भेटूया एक दिवस , खुप काही बोलायचं ग " थोडासा काळजी वाटणारा स्वर वाटला सरोजचा.
"हो खरच भेटूया , पण काय ग सगळा ठीक आहे ना आवाज का वाटतोय असा ?"
"ठीक आहे सगळ तु  भेट फक्त "
आज उद्या करत शेवटी आज मी आणि सरोज भेटणार आहोत.
संध्याकाळचे ४ वाजत आले मी निघायच्या बेतात होते पण या पठ्ठीचा  फोन लागतच नाहीये. मेसेज पण नाही तिचा सकाळपासून
काल संध्याकाळी उद्या भेटुया ठरल्याप्रमाणे असा फोन पण आला तिचा आणि आज काय झाले हिला या विचाराने माझी चुळबुळ सुरु झाली
सुमारे १ तासाने फोन वाजला,  सरोजचा असेल म्हणुन घाईने उचलला पण शर्वरीचा फोन होता
"बोल शर्वरी "
"अग आहेस कुठे तु एक वाईट बातमी आहे "
"काय झाले शर्वरी, बोल ग लवकर "
आपली सरोज गेली ग !!  गळफास लावून जीव दिला तिने आज सकाळी । शर्वरीचा हुंदक्यांचा आवाज आला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली
थरथर सुटली अंगाला. होते त्याच ठिकाणी मटकन बसले. जे ऐकले त्यावर विश्वास बसणे शक्यच नव्हते
गळफास लावला, सरोज ने?  आत्महत्या केली । छे  छे शक्यच नाही हे । आज भेटणार होती ती मला , काल फोन पण झाला आमचा । छे शर्वरी ची काहीतरी गफलत होतेय

"हेल्लो अग ऐकतीयेस ना " पलीकडून शर्वरीचा आवाज
अग काहीतरी काय शर्वरी कस शक्य आहे हे, आज मी आणि सरोज भेटणार होतो कॉफी शॉप मध्ये … मी तिच्यायचं फोन ची वाट बघत होते "
"खरच अग माझाही विश्वास बसत नाहीये कि आपली सरोज अस काहीतरी करेल"

फोन वर पुढे काही बोलायची शुद्धच नव्हती मला … काही क्षणांनी भानावर आले आणि मनात अनेक प्रश्नांनी गर्दी केली आणि डोळ्यात आसवांची गर्दी झाली
गोऱ्यापान सरोजचा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता . तिच्या माझ्या पहिल्या भेटीपासून ते कालच्या फोन पर्यंतच्या सगळ्या गोष्टी चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर उभ्या ठाकल्या… गळफास लावुन आत्महत्या करावी इतक्या  कमजोर मनाची सरोज नक्कीच नव्हती … मग काय झाले असे आणि सानिका सरोज च्या मुलीचे काय झाले  असेल

जरा सावरल्यावर मी परत शर्वरीला फोन केला । " अग तुला कोणी सांगितले हे आणि  सानिका कुठाय ग आणि सरोज चे मिस्टर "
"सानिका ना ….  या नंतर खुप शांतता "
"अग बोल न पुढे सानिकाचे काय " बोल ग शर्वरी पटकन … हि शांतता सहन नाही होत आहे मला "
परत हुंदक्याचे आवाज त्या दोन मिनिटांच्या शांततेने जणू आभाळच कोसळले होते माझ्यावर
"अग सानिका सुद्धा गेली ग " सानिका का ला झोपेच्या गोळ्या दिल्या सरोज ने आणि मग गळफास लावला स्वतःला " हे सांगताना शर्वरीचा आवाज सुद्धा कापत होता
"काय य य य … " माझी बोबडीच वळली … सुन्न झाले मन। आजुबाजूचा कोलाहल ऐकु येईनासा झाला … जे ऐकले ते खोटेच आहे असा होणे शक्यच नाही असच मनाला बजावत होते मी …. मला तिच्या घरी जाऊन बघितलेच  पाहिजे … स्वतःला सावरले … घरी फोन करून कळवले जे काही घडले ते …
तडक सरोज च्या घरी जायला निघाले . शर्वरी सुद्धा निघाली होती ।

Taxi घेतली …. आणि मनात प्रश्नांचा हलकल्लोळ  मजला … 
"Madam … o Madam " taxi चालकाच्या आवाजाने विचारतून बाहेर आले … त्याचे पैसे देऊन … तिच्या इमारतीत शिरले … खाली खुप गर्दी होती । आत्महत्या असल्याने पोलिस सुद्धा होते. सगळीकडे कुजबुज चालू होती …
"असे कसे केले हिने …  स्वतःहा जीव दिला  पण मुलीला का मारले …" असे खोचक उद्गार …
"अरेरे वाइट झाले रे … सरोज खुप चांगली होती … तिने असे करायला नको होते " असे सहानभूतीपूर्वक उद्गार
पोलिस त्यांचे काम करत होते … आणि माझी नजर संदीप ला शोधत होती … संदीप सरोज चा नवरा …
त्याची काय अवस्था असेल याची मी कल्पनाच केली नव्हती … डोक्याला हात लावून निर्विकार चेहऱ्याने बसला होता तो ….
सगळे येउन त्याचे सांत्वन करत होते पण त्याचे कोणाकडेच लक्ष नव्हते … एकटक सरोज आणि सानिकाच्या निष्प्राण देहाकडे बघत होता
भकास वातावरण होते सगळीकडे …. सरोज च्या शांत देहाकडे बघून हीच का आपली सरोज … माझी खुप छान मैत्रीण … असे करण्यापूर्वी एकदा सुद्धा माझ्याशी बोलत नाही आले का तिला … का का केले तिने असे … आजच भेटणार होती मला ती … काल फोन वर पण बोललो होतो आम्ही
सानिकाला पाहून तर हृदयात कालवा कालव झाली . डोळ्यातुन अश्रूंच्या धारा वाहु लागल्या …
जन्मदात्या आईने मारावे …  तडफडला असेल जीव तिचा
… पोलिसांची चौकशी चालू होती … रीतसर केस झाली … आणि संशयाची सुरी संदीप कडे होती … पण संदीप च्या विरोधात पुरावा काहीच सापडलं नव्हता
सरोज खूप मनमिळाऊ असल्याने आजुबाजुच्यांकडून सुद्धा ठोस काहीच कळले नाही …
सरोज च्या आईला दिलासा देऊन काही मदत लागली तर सांगा। संदीप ला सुद्धा सावर स्वतःला असे सांगून मी आणि शर्वरी निघालो

नंतरचे २ दिवस याच विचारात गेले … तिने अशी टोकाची पावलं का उचलली … या गोष्टीचे राहून राहून आश्चर्य वाटत होते …. खूप विचार करून शेवटी मन ह्याच प्रश्नाशी येउन थांबत होते … असे का केले तिने … या का चे उत्तर काही केल्या मिळत नव्हते

माझी अतिशय जवळची मैत्रीण असल्याने या तिच्या वागण्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला होता … आम्ही दोघीही\स्वतःच्या आयुष्यात रमलेल्या होतो शाळेपासूनची आमची मैत्री आमच्या दोघींच्या लग्नानंतरही तशीच टिकून होती … आणि ह्या मैत्रीचा मला खूप अभिमान होता … पण सरोजच्या अश्या वागण्याने आज त्या अभिमानाला तडा गेला होता
आम्ही रोज भेटत नसलो तरीही महिन्यातून एक दोन वेळा भेटणं व्हायचे . फोन व्हायचे …. गेले काही दिवस ती अस्वस्थ होती खरी … सतत म्हणायची खूप बोलायचं तुझ्याशी, मन मोकळा करायचं  … पण भेटल्यावर काहीतरी कारण सांगुन बोलणं टाळायची … तशी हळविच होती सरोज पण कमजोर नव्हती । समोर आलेल्या परिस्थितीला सामोरे जायची धमक होती तिच्यात … पण आता असे काय झाले
तिच्यात आणि संदीप मध्ये काही भांडण झाले असेल का? … ओफिस मध्ये काही प्रोब्लेम असेल का?
स्वतःच्याच मुलीला झोपेच्या गोळ्या देऊन , तिच मरण बघुन स्वतःहा गळफास लावुन घेणे इतका टोकाचा अघोरी निर्णय एक आई घेऊ शकते का ? कुठे जातात संवेदना अशा वेळी ? ज्या मुलीला ९ महिने वाढवले तिलाच मारावे …. मन इतका कठोर कस होऊ शकते … एक आई म्हणुन मला सरोज चा अतिशय राग आला , कीव वाटली , दुक्ख वाटले … एवढ्याश्या जीवाला मारताना तिला काहीच वाटले नसेल का ….
पण तिच्या अश्या अवचित जाण्याने खुप प्रश्न उभे राहिले … कदाचित कधीच  न संपणारे प्रश्न !

रविवारची दुपार . थोडावेळ झोप घ्यावी या विचारात असताना बेल वाजली  दरवाज्यात संदीप होता … सरोज चा नवरा ।
"सरोज चे कपाट आवरत असताना एक लिफाफा सापडला आहे, त्यावर तुमचे नाव आहे  आत काय आहे माहित नाही , तेच देण्याकरिता आलो होतो "
जुजबी चौकशी झाल्यावर संदीप निघुन गेला
लिफाफा फोडला तर आत सरोज चे पत्र होते माझ्या नावचे. तारीख शुक्रवारची होती म्हणजे तिने आत्महत्या करायच्या आधी एक दिवस … अंगावर शहारे आले… म्हणजे हा निर्णय तिने ठरवून घेतला होता कुठेही भावनेत ती अडकली नव्हती
मी थरथरत्या हाताने ते पत्र वाचायला सुरवात केली

प्रिय सुमन ,
तुला आश्चर्य वाटले असेल ना … माझे पत्र बघून … इतक्या वेळेला आपण भेटतो मग हे पत्र कशाला … पण कधी कधी शब्दच जवळचे वाटतात ग … काही काही गोष्टी समोरासमोर बोलता येत नाही … खुप मनाशी ठरवून आज हे पत्र तुला लिहिते आहे … मला खात्री आहे कि फक्त तुलाच हे समजेल … तुच माझ्या भावना समजून घेऊ शकतेस … आपण उद्या  भेटणारच आहोत पण तेव्हा बोलायला मी असेन कि नाही मला माहित नाही म्हणून हे पत्र
या पत्रातून  मी सगळा काही बोलणार आहे तुझ्याशी … तुझ्यासारखी जीव लावणारी मैत्रीण मला मिळाली या सारखे भाग्य नाही … त्याच मैत्रीला जागून विश्वासात घेऊन मी तुला सगळा सांगणार आहे
खुप दिवस मनात खुप खळबळ चालूये माझ्या … मला नाही वाटत माझ्या जगण्याला काही अर्थ उरलाय … सगळा निरर्थक वाटायला लागले आहे … मी माझे जीवन संपवायचा निर्णय घेतला आहे … मी गेल्यावर माझ्या सानिकाचे काय होईल या काळजी पोटी तिलाही मी माझ्यासोबत घेऊन चालले आहे
किती सुंदर दिवस होते  आपले कॉलेज मधले … अगदी फुलपाखरा सारखे … किती धमाल करायचो आपण ,
खुप महत्वाकांक्षी होते मी …. नवीन काहीतरी करायची सतत इच्छा … कॉलेज च्या प्रत्येक स्पर्धेत भाग घायचे आणि जिंकायचे सुद्धा
आणि त्याच फुलपाखरी दिवसात माझ्या आयुष्यात "तो" आला आणि आयुष्याच बदलुन गेले ग !! सुख म्हणतात ते हेच असे वाटू लागले
सकाळ दुपार संध्याकाळ त्याच्याच विचारात जायची । तो आणि मी एकमेकांमध्ये हरवून गेलो होतो … या सगळ्याची साक्षीदार तू आहेस. त्याच्या बद्दल वाटणार्या सगळ्या भावना मी प्रथम तुलाच सांगितल्या होत्या…  तू सुद्धा माझ्या आनंदात सहभागी व्हायचीस . एक दिवस तो काळा  दिवस आला  माझ्या घरी अण्णांना हि गोष्ट कळाली… अतिशय शिस्त प्रिय कडक असे माझे अण्णा। त्यांना हि गोष्ट पटली नाही… त्यांचा कडाडून विरोध…. टोकाची भांडणं, आरडा ओरडा  , तू त्याचा नाद सोडला नाहीस तर माझे मेलेले तोंड बघशील अश्या धमक्या … याने खुप वैतागुन गेले होते….तुझ्याच मदतीने मी त्याला शेवटचे भेटले आणि या पुढे आपण भेटू शकत नाही , अण्णांनी माझे लग्न ठरवले आहे , हे ऐकल्यावर तो पुरुष असुन सुद्धा ढसाढसा रडला होता … त्याला त्याच अवस्थेत सोडुन मी निष्ठुर पणे निघून आले होते . तू काळजी करू नकोस, तुझ्या आयुष्यात मी परत येणार नाही , माझ्याकडून तुला कसलाच त्रास होणार नाही, तु आनंदात राहा असा निरोप त्याने तुझ्याबरोबर पाठवुन त्याच्या खऱ्या प्रेमाची साक्षच जणु दिली .

अण्णांनी कॉलेज सोडायला लावले आणि संदीप शी लग्न ठरवले … खुप प्रयत्न केला अण्णांना समजवायचा पण शेवट पर्यंत ते कशालाच बधले नाहीत ,डोळ्यातले पाणी आटायची वेळ आली तरी अण्णांच्या विरोधापुढे माझे काहीच चालेले नाही … शेवटी त्यांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न करायला तयार झाले … मन मारले स्वताचे , आयुष्यातली खुप मोठी adjustment केली मी … आणि  आजतागायत करत राहिले. स्वताच्या मनाप्रमाणे मी जगु शकते या वरचा विश्वास उडत चालला होता. संदीप च्या सहवासात मी त्याला विसरू शकेन असे वाटले होते … पण तसे नाही झाले … त्याचे विचार खूप प्रयत्नाने मनाच्या  तळाशी गाडून टाकले … संदीप माझ्यावर प्रेम करायचा पण त्याच्या प्रेमाला संशयाची झालर होती … कशाचीच कमी नव्हती खायला प्यायला खूप होते पण त्यावर स्वताचा हक्क नव्हता … सतत दडपणाखाली जगत आले … काय करतेस कुठे जातेस , अश्या प्रकारचे प्रश्न माझी पाठ सोडत नव्हते… कुठेतरी पळून जावे असे वाटत असताना सानिकाची चाहूल लागली … वाटले आता माझे आयुष्य  खुप छान होऊन जाईल … सानिकाच्या बाल लीला बघून मनातली हि आंदोलने कमी होत होती … … पण देव माझी परीक्षा बघत होता … माझ्या आयुष्यात चांगले क्षण त्याने टिकू दिले नाहीत.
एक दिवस भाजी घेत असताना तो माझ्या समोर आला. जखमेवरची खपली निघावी आणि भळाभळा रक्त निघाव तश्या मनाच्या तळाशी इतके दिवस दाबून ठेवलेल्या सगळ्या आठवणी डोळ्यातून बाहेर पडू लागल्या. अचानक त्याच्या येण्याने मला त्याच्याशी काय बोलावे सुचलेच नाही । माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली, त्यानेच मला मला सावरले आणि माझ्या घरी घेऊन आला. संदीप ने त्याचे आभार मानले आणि तो माझ्याशी एकही शब्द न बोलत निघून गेला. तो निघून जाताच संदीप च्या प्रश्नांची सरबत्ती चालु झाली… तो कोण होता , त्याने तुला हात कसा लावला, मी त्याच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तर द्यायच्या मनस्थितीत नव्हते… मला शांत बघून संदीपची  अस्वस्थता वाढायला लागली… त्याची संशयी वृत्ती वाढायला लागली. आणि त्याने  रागाच्या भरात माझ्यावर हात उचलला. मी रडत होते . माझे लक्ष दरवाज्यापाशी गेले तर दरवाज्यात तो उभा होता … त्याची पिशवी राहिली चुकून म्हणून ती घ्यायला आला होता आणि त्याने जे पाहायला नको होते तेच त्याने पहिले.

दुसर्यादिवशी संदीप मला sorry म्हणाला… त्याला कळत होते कि आपला चुकतंय पण त्याची संशयी वृत्ती काही कमी होत नव्हती …. संशय हा खुप भयानक रोग आहे … कधीही न बरा होणारा ….  या प्रसंगा नंतर तर माझ्या येण्या जाण्यावर त्याचे बारीक लक्ष होते …। मी कुठे जाते , काय करते , कोणाशी बोलते , या सगळ्याची कसून चौकशी होत असे….

किती वेळा तुला भेटायचे सुमन पण बोलूच शकायचे नाही …. तुला भेटायला येताना पण हा माझ्या मागेच असायचा
एक दिवस असाच परत तो समोर आला … या आधी भेटला तसाच पण या दोन्ही भेटी अगदी योगायोगाने घडल्या होत्या … त्याने लग्न केले नव्हते …  प्रेमाशी प्रामाणिक राहण्याचा निर्णय त्याने घेतला होता…. संदीप चे त्यादिवशीचे वागणे बघून मी कुठल्या आणि कोणत्या परिस्थितीतून जात असेन याची त्याला कल्पना आली … नंतरच्या  भेटी  मात्र ठरवून झाल्या … इतके दिवस चिरफाड झालेले मन त्याच्या येण्याने सुखावले होते… पण आम्ही कुठलीच मर्यादा ओलांडली नव्हती …. भाजी घायच्या निमित्ताने नाहीतर तुला भेटायच्या निमित्ताने आणि आता सानिकाला nursary मधे सोडायला जायच्या निमित्ताने मी बाहेर पडायचे… त्याच वेळी मी त्यालाही भेटायचे … विसरून गेलेले हसू परत चेहऱ्यावर उमटू लागले …. माणूस सतत आधार शोधात असतो … आणि त्याला हवा तसा आधार मिळाला कि आपोआपच तो खुलून येतो … संदीप चे प्रश्न , माझ्यावरचा संशय , अति चौकस बुद्धी मला सवयीची झाली होती …
पण देवाच्या मनात काही वेगळेच होते… एक दिवस मला आणि त्याला संदीप ने पहिले … आम्ही एक १० मिनिटच भेटायचो…
मी घरी आल्यावर "हा तोच आहे ना ज्याने तुला उचलून घरी आणले होते " "उचलून" या शब्दावर जर जास्तच जोर दिला होता त्याने… मी त्याला माझ्या परीने खूप समजावले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही …. त्याचे वागणे जास्तच वाईट होत गेले…. मी आयुष्याच्या अशा वळणावर येउन उभी होती कि इच्छा असून पण मी त्याच्या सोबत परत जाऊ शकत नव्हते …. संदीप बरोबर मी नातिचरामी म्हणून आयुष्य काढायचा निर्णय घेतला होता … अण्णाना वचन दिले होते त्यांचे  नाक कापले जाईल असे काहीही करणार नाही…… सानिका कडे बघून मी आयुष्य काढत होती …
सुमन , तुझी कणखर सरोज आता पूर्ण कोलमडून गेलीये ग … तो परत माझ्या आयुष्यात का आला …. जीवन साथी म्हणून देवाने मला असा माणूस का दिला?? असे प्रश्न मला कुरतडू लागले होते
मनाचा किती झगडा चालवा हा , देवाने असा का खेळ मांडलाय माझ्याशी…. त्या दिवशी संध्याकाळी रामाच्या देवळात गेले होते … डोळे मिटून शांत बसले …. खुप शांत वाटले … डोकं थोड ता ळ्यावर आल्यासारखे वाटले … तो माझ्या आयुष्यात आलाय म्हणून मी वाहवत जाऊ शकत नाही … अण्णांना वचन दिलाय मी संदीप शी एकरूप राहीन म्हणून, ते वचन कसे तोडू … संदीप संशयी आहे पण त्याला जाणीव आहे तो चुकीचा वागतोय याची , त्याचा त्याच्याच स्वभावाशी झगडा चालू असतो… कधी इतक्या प्रेमाने बोलतो तर कधी इतका संशय घेतो… त्याला सांभाळता सांभाळता जीव नकोस होतो … या सगळ्यातून हसत जगायची इच्छा मला माझ्या सानिका कडून  मिळते… माझी गोरी गोरी , गुबरे गुबरे गाल असलेली सानिका … तिच्या हसण्यातून मला जगायची नवीन उमेद मिळते.… त्यादिवशी त्याला मी स्वताहून भेटले … काही वर्षांपूर्वी त्याला जे सांगितले तेच परत सांगितले …. तेव्हा नाईलाजाने आणि आता स्वताहून… अण्णांना दिलेले वचन मी नाही मोडू शकत…. ज्याच्या बरोबर सात फेरे घेतले त्याच्याशी एकरूप राहायचे असते अश्या संस्कारात वाढली आहे मी … माझ्यावर सानिकाची जबाबदारी आहे….
इतका सारासार विचार करून पण मी इतका टोकाचा निर्णय का घेतला असा तुला प्रश्न पडला असेल ना
तर ऐक
त्या दिवशी रामाच्या देवळातून घरी जाताना त्याला भेटले आणि परत न भेटण्याचे वाचन घेऊन तुला फोन केला उद्या भेटायचे confirm केले आणि हे सगळ तुला सांगून मन अगदी मोकळ करायच  असे ठरवले होते  
कुठेतरी मन शांत झाले होते , घरी पोचले , संदीप घरीच होता
"इतका वेळ का लागला? , कोणाला भेटायला गेली होतीस " सवयी नुसार प्रश्न चालू झाले… पण माझ्या उत्तरांनी त्याचे समाधान झाले नाही …. त्याचा आवाज बदलला "त्यालाच भेटायला गेली होतीस ना , काय संबंध आहे त्याच्याशी तुझा " मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला … पण तो ऐकायलाच तयार नव्हता…. शेवटी त्याने माझ्या चारित्र्यावर शंका घेतली । सानिका त्याची मुलगी नाहीच आहे असे म्हणाला ….

सुमन प्रेम करणे पाप आहे का ग ? मी माझा तोल कुठेही ढासळू दिला नाही , आयुष्यभर संशयी वृत्तीच्या नवऱ्याशी एकनिष्ठ राहिले आणि आज तोच नवरा माझ्यावर इतकी मोठी शंका घेतो …. सरते शेवटी त्याचा रोख सानिका कडे वळला , तेव्हा मात्र माझ्यातली आई जागी झाली …. त्याच्यापेक्षा वरच्या आवाजात त्याला ओरडून सांगितले " माझ्या सानिकाला काही केलास आणि बोललास तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल " … सानिका माझी मुलगी नाही ती या घरात राहू शकत नाही असे सारखे म्हणू लागला … पण माझ्या अश्या ओरडण्याने तो घुश्यात निघून गेला …।
कितीतरी वेळ सुन्न होते मी …।
इतके दिवस संदीप माझ्यावर संशय घेत होता ते मी सगळे सहन केले … पण माझी गोंडस सानिका …. तिचा काय दोष …. तसाही दोष कोणाला देऊ मी
मला माझं प्रेम विसरायला लावून या दृष्ट चक्रात ढकलणार्या अण्णांना , माझ्यावर निस्सीम प्रेम करून आजन्म त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेणाऱ्या त्याला , संशयी स्वभावाशी झगडणाऱ्या माझ्या नवर्याला, कि स्वताला

हे कुठेतरी थांबले पाहिजे …। जे मी सहन केले ते माझी सानिका सहन नाही करणार …। हे सगळा सोडून कुठेतरी पळून जायची हिम्मत माझ्यात राहिली नाही …। आणि  आता सहन नाही होत आहे  ….  आपल्या पोटाच्या गोळ्यावर हि वेळ येणार असेल तर ते मी सहन नाही करणार …. या क्षणी मी फक्त एक आई म्हणून विचार करतेय पण सानिका वर सगळे आले मग माझा तोल सुटू लागला …. माझ्यातली खंबीर सरोज कोलमडून गेली
जीव द्यायचा विचार सर्रकन डोक्यात आला पण मी गेले तर सानिकाचे काय … संशयाचे भुत डोक्यावर घेऊन तीने का आयुष्यभर मराव … मी तिला असे सोडून नाही जाऊ शकत
डोक्याला किक बसावी तशी उठले… देवासमोर बसले , त्याची माफी मागितली , सानिकाला पोटाशी धरले  उर फाटेपर्यंत रडले …. तिचे  खूप पापे घेतले … आपली आई का रडतीये हे भाबड्या डोळ्यांनी बघत होती …. मन घट्ट केले … डोळे पुसले आणि माझ्या सोबत सानिकाचे सुद्धा जीवन संपवायचा निर्णय पक्का केला
सुमन मला माफ कर …. तुझ्या सुंदर मैत्रीसाठी धन्यवाद ……


तुझी मैत्रीण
सरोज


माझ्या डोळ्यातून अखंड अश्रूंच्या धारा वाहत होत्या …. माझी मैत्रीण इतक्या दबावाखाली आयुष्य काढत होती … पण तिच्या हसर्या चेहरऱ्या मुळे कधीच लक्षात आले नाही….हसर्या चेहऱ्या मागे इतके दुक्ख असेल याची मी कल्पनाच केली नव्हती मी … सुन्न झाले होते मन …।