Saturday, 21 March 2015

बासरीवाला

मे महिन्याची टळटळीत दुपार उन्हामुळे सगळीकडेच रखरखीत शांतता
मलूल झालेली झाडं ,मधूनच डोकावणारे फांदीवरचे पान
कोरडा रस्ता , त्यावरून गुणगुणत जाणारी एखादी रिक्षा
एकुणच काहीसे उदास वातावरण

प्रयत्न करूनही झोप येत नव्हती या कुशीवरून त्या कुशीवर करण्यापेक्षा उठावे या विचाराने उठले
तोंडावर पाण्याचे हबके मारून बाल्कनीत येउन बसले
कितीही गरम होत असले तरीही चहाची तल्लफ कशी आवरणार
त्यामुळे सोबत चहाचा कप हि होता

पुस्तक वाचावे या विचाराने उठणार तेवढ्यात दूरवरून गाण्याचे सुर ऐकू आले
काही मिनिटातच दूरवरून येणारे ते सुर स्पष्ट ऐकू येऊ लागले
ते सुर बासरीचे होते 
"बासरी " किती सुबक आणि देखणे वाद्य . गाण्याच्या लहरी किती सहज येतात त्यातून

मै जिंदगीका साथ निभाता चला गया हर फिक्र को धुवे मे उडता चला गया….  !!
छु लेने दो नाजूक होटो को …….  !!
चंदन सा बदन …… !!!
मेरे मेहबुब तुझे मेरी मोहब्बत कि कसम …। !!!


एक से एक गाण्याचे मुखडे त्याच्या बासरीतून लीलया बाहेर पडत होते
डोळे शांत मिटून हवेहवेसे वाटणारे ते सूर मी मनात साठवून ठेवत होते
पायांनी  माझ्याही नकळत ठेका धरला . गाण्याच्या लयीवर हाताचे बोट वर खाली होत होते
आणि तीच लय साधून मानही अगदी लयीत घुमत होती

रखरखीत शांततेचा भंग करणारे ते सूर थांबूच नये असे वाटत होते
बासरीचा  कोमल सुर उन्हाची काहिली थंडावत होते

अचानक ते सुर थांबले
नयनरम्य स्वप्नातुन खडबडून जाग यावी तशी जागे झाले

बाल्कनीतून खाली वाकून पाहिले
मी सुर शोधत होते 
त्या सुरांच्या नादात इतकी देखणी बासरी वाजवणारा बासरीवाला कोण आहे याचे भानच नव्हते मला
फार आतुरतेने मी त्या बसारीवाल्याला शोधत होते
कृष्णाच्या बासरीवर जसे गोकुळवासी तल्लीन होतात तसेच माझेही झाले कि काय असच वाटत होते

दुसऱ्या मिनिटाला हळुच दरवाजा उघडून खाली गेले … त्या बासरीवाल्याच्या शोधात
बिल्डींगच्या कठड्याला टेकून पाठमोरा बसला होता तो. हातात ती देखणी बासरी होती. बाजूला प्लास्टिक पिशवी त्यात पाण्याची रिकामी बाटली कपडे तसे बरे आणि डोळे मिटलेले .
काही वेळापूर्वी सुंदर बासरी वाजवणारा तो बासरी थांबवून झोपला कसा याचे थोडे आश्चर्य वाटले
खूप वेळ उन्हात चालून थकलेला वाटला . तोंडावर घामाचे बिंदू चमकत होते

त्यांना कदाचित भूक लागली असावी तहान लागली असावी असा विचार मनात आला
काहीश्या संकोचाने "काका " असे म्हणत त्यांच्या खांद्याला हात लावला

शॉक बसावा तसा हात चटकन मागे आला
हृदयाची धडधड वाढली काळजात चर्रर झाले
डोळ्यात टचकन पाणी आले

क्षणात मागे वळले. मागे खालती राहणारे करकरे काका उभे होते
तेही असेच बासरीवेडे बासरीच्या थांबलेल्या सुरांच्या शोधत इथेपर्यंत पोचलेले
आम्ही दोघांनीही त्या बासरीवाल्याकडे पाहिले

तो कलेचा उपासक निपचित पडून होता
त्या टळटळीत दुपारी सुरांची गार झुळूक पसरवणारा तो स्वताच थंडावला होता
कोण कुठला आपल्या बासरीने आनंद पसरवतो आणि आयुष्य क्षणभंगुर आहे हे वास्तव दाखवून देतो
शेवटच्या श्वासापर्यंत कलेशी सुरांशी एकनिष्ठ राहणाऱ्या त्या कलेच्या उपासकासमोर नतमस्तक झाले
अनंताच्या प्रवासाला निघालेल्या त्याला आम्ही दोघांनी प्रणाम केला

करकरे काकांनी मला हलकेच थोपटले आणि बासरीवाल्याच्या पुढील  कार्याच्या तयारीस लागले

No comments:

Post a Comment